मूळ लेख - श्री . राजेंद्र म्हात्रे - https://qr.ae/pCpYVE लेखकाच्या पूर्वपरवानगीने इथे पुनःप्रकाशित
म्युच्युअल फंड म्हणजे चुलीवरचं, मंद आचेवरचं जेवण!
शिजायला वेळ लागतो, पण लागतंही रुचकर!
तुम्हाला जर झटपट श्रीमंत व्हायचं असेल, तर कृपया या फंदात पडू नका कारण कोणताही फंड लाभदायक होण्यासाठी तीन ते पाच वर्षे लागतात.
म्युच्युअल फंडांत मुख्यतः तीन पर्याय असतात.
.. लाभांश .. जेव्हा जेव्हा फंड डिव्हिडंड देतो, तेव्हा तेव्हा तो आपल्या खात्यात जमा होतो. ज्यांना अधे मध्ये पैशाची गरज भासते, अशांसाठी उपयुक्त.
.. लाभांश पुनःगुंतवणूक .. जेव्हा जेव्हा फंड डिव्हिडंड देतो, तेव्हा तेव्हा त्या रकमेचे युनिट्स आपल्या खात्यात जमा केले जातात. परिणामी, खरेदी करतानाची मूळ रक्कम स्थिर असली तरी युनिट्स वाढल्याने सरासरी किंमत (purchase price) कमी होत जाते. उदा: सुरवातीला ₹.१०००० मध्ये आपण १००० युनिट्स घेतले असतील तर दोन वर्षांनीं २०% डिव्हिडंड जाहीर झाल्यावर वरच्या उदाहरणात ₹.२००० त्याच्या खात्यावर जमा होतील तर येथे (इथे असे गृहीत धरले आहे की दोन वर्षांनी ₹.१० च्या युनिट्सची किंमत ₹.१२ झाली व २०% डिव्हिडंड जाहीर झाला.) ₹.२००० चे ₹.१० च्या दराने २०० युनिट्स त्याच्या खात्यात जमा होतील.
म्हणजेच, आता ₹.१०००० च्या मूळ गुंतवणुकीवर त्याच्याकडे १००० च्या ऐवजी १२०० युनिट्स असतील. म्हणजे सरासरी किंमत ₹.१० च्या ऐवजी ₹.८.३३.
तिसरा प्रकार आहे, वाढ. या प्रकारात कोणताही लाभांश दिला जात नाही व जसजसे शेअर मार्केट वाढते, (जे निरंतर वाढतच असते. २००८ साली ८००० च्या आसपास असलेला सेन्सेक्स आज ८१००० च्या वर आहे), तसतशी याची किंमत वाढत जाते.
सर्व प्रकारांत, आपण आपले युनिट्स केव्हाही, अगदी घरबसल्याही, विकू शकतो, अपवाद दोनच : जर तुम्ही आयकराचा लाभ घेण्यासाठी ELSS फ़ंडात गुंतवणूक केली असेल, तर तीन वर्षे विकू शकत नाहीत. दुसरं म्हणजे इतर कोणतीही गुंतवणूक एक वर्षाच्या आत विकली, तर थोडा भार द्यावा लागतो.
इथे गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे.
जर तुम्हाला ८० सीसी अंतर्गत कर बचतीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर फक्त ELSS फंडच निवडा.
आपण निवडलेला फंड कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमधे गुंतवणूक करत आहे याचा अभ्यास करायला हवा. सध्या लक्षणीय वाढ आणि "तेजी" अनुभवणाऱ्या क्षेत्रांमध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि एआय, क्लाउड आणि डिजिटल परिवर्तनाद्वारे चालविल्या जाणाऱ्या डिजिटल सेवा; महत्त्वाकांक्षी सरकारी लक्ष्यांमुळे आणि वाढत्या जागतिक मागणीमुळे अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही); आणि डिजिटल आरोग्य, औषधनिर्माण आणि नाविन्यपूर्ण उपचारांवर वाढत्या आरोग्य सेवा क्षेत्र यांचा समावेश आहे. भारतातील इतर उच्च-वाढीव क्षेत्रे म्हणजे फिनटेक, ई-कॉमर्स, कृषी आणि अन्न प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा. सोनं दिवसेंदिवस वाढत आहे, अशा वेळी गोल्ड इटीएफ फंड फायदेशीर ठरू शकतात.
दर तीन महिन्यांनी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या. बदललेले सरकारी धोरण फायदेशीर अथवा तोट्याचं ठरू शकते. सिमेंटच्या निर्यातीवर अचानक आलेल्या बंदीचे परिणाम सिमेंट कंपन्यांच्या शेअर्सवर होऊ शकतात. तुमच्याकडे असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
त्या फंडाचा गेल्या किमान पाच वर्षांचा इतिहास पडताळून पहा. आर्थिक अडचणींच्या काळात त्या फंडाने कशी कामगिरी केली ते पहा. त्याच्या एन ए व्ही (net asset value) मध्ये किती वाढ झाली, ती त्या प्रकारच्या इतर फंडांच्या तुलनेत कशी आहे, कितीवेळा लाभांश दिला, हे पहा.
SIP, किंवा दर महिना गुंतवणूक, ही एकरकमी केलेल्या गुंतवणुकीपेक्षा नक्कीच लाभदायक असते. याबद्दल अधिक माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रात येत असतेच.
तुम्हाला शुभेच्छा !
नमोस्तुते !
---
मूळ लेख - श्री . राजेंद्र म्हात्रे - https://qr.ae/pCpYVE लेखकाच्या पूर्वपरवानगीने इथे पुनःप्रकाशित